मुंबई

Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्राला जो मुख्यमंत्री हवा होता, तो दादांच्या रूपाने कायमचा हरपला’; देवेंद्र फडणवीस शोकप्रस्तावात भावूक

•अजित पवारांच्या आठवणीने मुख्यमंत्र्यांचे डोळे पाणावले | ‘पोकळी’ या शब्दाची व्याप्ती दादांच्या जाण्याने कळली!

मुंबई :- “अजित पवार हे एक उत्तम मुख्यमंत्री होते, दुर्दैवाने असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही केवळ शब्दांपुरती मर्यादित नसून, ती कधीही भरून न निघणारी हानी आहे,” अशा अत्यंत भावूक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्र्यांनी अजित दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

13 व्या अर्थसंकल्पाची हुकलेली संधी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “यावर्षी दादांनी आपला 12 वा अर्थसंकल्प मांडला असता आणि पुढच्या वर्षी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असती. कदाचित सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे नेते म्हणून ते इतिहासात अजरामर झाले असते, पण नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. आज त्यांच्या अनुपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे, हे माझे दुर्दैव आहे.”

‘लाडकी बहीण’ योजनेचा तो ठाम निर्धार

अजित पवारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, “दादा कठोर निर्णय घ्यायला कधीच कचरले नाहीत. जेव्हा वित्त विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक भारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तेव्हा अजित पवारांनीच ठामपणे उभे राहून ही योजना मार्गी लावली. त्यांच्या आग्रहामुळेच लाखो बहिणींच्या खात्यात पैसे पोहोचू शकले.”

गुलाबी जॅकेटच्या आठवणी आणि भावनिक साद

“लाडकी बहीण योजनेनंतर दादांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती आणि आम्हालाही ते घालायला लावले होते. आज त्या गोष्टी फक्त आठवणी म्हणून उरल्या आहेत,” असे म्हणताना मुख्यमंत्र्यांचा आवाज गहिवरला होता. त्यांनी महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील पंक्ती वाचून दाखवत आपल्या अंतःकरणातील वेदना व्यक्त केल्या.

अजित दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही

“अनेकदा मोठ्या नेत्यांच्या निधनानंतर आपण पोकळी निर्माण झाली असे म्हणतो, पण दादांच्या जाण्याने ‘पोकळी’ या शब्दाची खरी व्याप्ती मला आज कळत आहे. अजित दादांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. हे केवळ राजकीय नुकसान नाही, तर आमच्या अंतःकरणाला लागलेली कधीही न भरणारी जखम आहे,” असे उद्गार फडणवीसांनी काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0