पुणे

Pune gangster Nilesh Bansilal Ghaywal : गोळीबार प्रकरणातील ‘मकोका’ आरोपी नीलेश घायवळ स्वित्झर्लंडला पसार! ‘तत्काळ’ पारपत्र प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू

Pune gangster Nilesh Bansilal Ghaywal : अहिल्यानगरमधून बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवले; 90 दिवसांच्या व्हिसावर परदेशात पलायन

पुणे :- पुणे शहरातील कोथरूड भागात गोळीबाराचा गुन्हा दाखल असलेला आणि नुकताच ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाईचे आदेश दिलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ 90 दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला पसार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

या गंभीर गुन्ह्यातील आरोपीने अहिल्यानगरमधून ‘तत्काळ’ पारपत्र (Passport) मिळविल्याचे स्पष्ट झाले असून, या पारपत्र प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत. इतक्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला आरोपी पोलीस पडताळणीमधून सुटला कसा, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कोथरूड गोळीबार आणि दहशत

17 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घायवळ टोळीतील सराइतांनी कोथरूड भागात एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला होता आणि त्यानंतर कोयत्याने वार करत दहशत माजविली होती. या प्रकरणी पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत यांच्यासह सहा आरोपींना अटक केली आहे. या गोळीबार आणि दहशत माजविल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाईचे आदेश दिले आहेत.

बनावट कागदपत्रांचा वापर

गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर घायवळने मूळचा रहिवासी असलेल्या अहिल्यानगर (जामखेड) येथून बनावट कागदपत्रांद्वारे तत्काळ पारपत्र मिळवले आणि पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी तो परदेशात पसार झाला. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे.

पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

घायवळ (वय 29) याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही अहिल्यानगर पोलिसांनी पारपत्र मिळविताना केलेली पोलीस पडताळणी करताना घायवळच्या बाबतीत काहीच वावगे कसे आढळले नाही, याबद्दल आता मोठी चर्चा सुरू आहे.

पोलीस आयुक्तांचे वक्तव्य

या प्रकरणावर बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “नीलेश घायवळने अहिल्यानगरमधून पारपत्र मिळविले असून तो स्वित्झर्लंडमध्ये पसार झाला आहे. त्याने पारपत्र कसे मिळवले, यादृष्टीने पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल.”

दरम्यान, गोळीबार प्रकरणासोबतच घायवळविरुद्ध बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात सोमवारी आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago