मुंबई

घाटकोपरमधील ‘गोल्डक्रेस्ट’ व्यावसायिक इमारतीला भीषण आग; अनेकजण अडकले

•आगीचे लोळ वरच्या मजल्यांपर्यंत; अग्निशमन दलाकडून शिड्या लावून लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

मुंबई :- घाटकोपर पश्चिम येथील ‘गोल्ड क्रेस्ट बिझनेस पार्क’ या व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर आज (सोमवार, 13 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे लोळ इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत दिसत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अग्निशमन दलाची धावपळ

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही इमारत पूर्णपणे व्यावसायिक असल्याने यात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. फायर अलार्म वाजताच अनेक कर्मचाऱ्यांनी इमारतीतून बाहेर धाव घेतली.

मात्र, इमारतीत अजूनही काही लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. धुरामुळे या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असून ते गुदमरत आहेत. अडकलेल्या लोकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेगवेगळ्या मजल्यावरील खिडक्यांना शिडी लावून त्या शिडीद्वारे अनेकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

सध्या आग विझवण्याला आणि इमारतीत अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

vivek

Recent Posts