
Marathi Letter ; गृहमंत्रालयाच्या नव्या भूमिकेचे राज्यात स्वागत; बावनकुळे, राधाकृष्णन यांची प्रतिक्रिया
मुंबई | हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्रात असंतोष वाढत असतानाच केंद्र सरकारने मराठी भाषिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. यानुसार, मराठी भाषेतून प्राप्त होणाऱ्या पत्रांना आता मराठीतूनच उत्तर दिले जाईल, अशी घोषणा संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी दिली.
शर्मा यांनी स्पष्ट केले की, “राजभाषा समितीचा उद्देश हिंदीसह प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणे हाच आहे. त्यामुळे मराठी पत्रव्यवहाराला मराठीतच प्रतिसाद दिला जाणे हे भाषिक सन्मान आणि प्रशासनिक पारदर्शकतेसाठी अत्यावश्यक आहे.”
या निर्णयामुळे महायुती सरकारला भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय दिलासा मिळाला असून मराठी भाषिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याचाच पल्ला वाढवत तामिळ भाषेतील पत्रांनाही तामिळमधूनच उत्तर दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “माझ्या अनुभवात, हिंदी समजून घेणं शक्य आहे. मात्र प्रादेशिक भाषांचा गौरव राखला गेला पाहिजे. मी विद्यापीठांना जपानी, मँडरिन आणि जर्मनसारख्या भाषांचाही विचार करण्याचे सुचवले आहे.”
चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट काय?
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल नुकतंच ट्विट केलं असून यात त्यांनी म्हटलं की, “समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की, मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं माय मराठीचा अगोदरच गौरव केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात करण्यात येणाऱ्या या क्रांतिकारी बदलाचा प्रत्येक मराठी भाषिक आनंदाने स्वागत करतो आहे. हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.”



