मुंबई

Maratha Reservation Morcha : ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणेने मुंबई दणाणली; मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल

• Manoj Jarange Patil In Azad Maidan भगवे झेंडे, टोपी घेऊन आंदोलक दाखल; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान परिसर आणि मुंबई महानगरपालिका मार्गावर मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.

पोलिसांनी अनेक अटी व शर्तींसह केवळ 5,000 आंदोलकांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही मर्यादा ओलांडली असून, मैदानासह संपूर्ण परिसर खचाखच भरला आहे. आंदोलकांच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगांमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

वाहतूक कोंडी आणि पोलिसांची धावपळ

आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांची मर्यादा संपल्यामुळे पोलीस आता आंदोलकांना मैदानाच्या बाहेरच थांबवत आहेत. मात्र, आक्रमक झालेले आंदोलक मैदानात जाण्यावर ठाम आहेत. या गोंधळातच काही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रास्ता रोको करून बसगाड्या आणि इतर वाहने थांबवली. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण रास्ता रोको सुरूच राहिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रस्ता रोधक उभारून गर्दीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी बेमुदत आंदोलन जाहीर केल्याने आता सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

vivek

Recent Posts