Maharashtra News : महाराष्ट्रात माओवाद संपला! ‘सोनू’सह 61 जहाल नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

माओवादी चळवळीचा ‘बॅकबोन’ मानला जाणारा सेंट्रल कमिटी सदस्य भूपती उर्फ सोनू आता मुख्य प्रवाहात

गडचिरोली :- माओवादविरोधात गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या निर्णायक लढ्याला आज ऐतिहासिक यश मिळाले आहे. नक्षलवादी चळवळ देशात अखेरच्या घटका मोजत असताना, गडचिरोलीत (Gadchiroli) जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ ‘सोनू’ उर्फ भूपती याच्यासह 61 जहाल माओवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. या घटनेमुळे माओवादी चळवळीचा कणाच मोडला असून, महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद जवळपास हद्दपार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे हा आत्मसमर्पण सोहळा पार पडला. यावेळी शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून संविधान हाती घेतले. ‘विकासाचा मार्ग बंदुकीच्या धाकावर नव्हे, तर लोकशाहीतून वृद्धींगत होतो,’ हे त्यांनी मान्य केले.

‘भूपती’ होता नक्षलवाद्यांचा ‘ब्रेन’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना या यशाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “दंडकारण्यात माओवाद्यांचा जो उदय झाला, विशेषतः अहेरी दलम, सिरोंचा दलम, चामोर्शी दलम या सशस्त्र सेनांचा बॅकबोन आणि ब्रेन सोनू उर्फ भूपती हा होता. भूपतीवर 6 कोटींचे बक्षीस होते आणि आज आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 10 डिव्हिजनल कमांडरचा समावेश आहे. त्याच्या शरणागतीमुळे नक्षली चळवळीचा कणा संपलेला आहे.”

गडचिरोली आता माओवादमुक्त

मुख्यमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. “उत्तर गडचिरोली अगोदरच माओवादमुक्त झाला होता. आता भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपल्याचे मी जाहीर करतो,” असे ते म्हणाले.

आता फक्त कंपनी 10 चे बोटावर मोजण्याइतके (8-10) लोकं शिल्लक आहेत. त्यांच्याकडे कोणताही मोठा नेता उरलेला नाही. त्यामुळे तेही लवकरच आत्मसमर्पण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्राचे उद्दिष्ट पूर्ण

केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्च 2026 पूर्वी देशातून माओवाद संपवण्याचे जे उद्दिष्ट ठेवले होते, त्याच्यापूर्वीच महाराष्ट्राने माओवाद, नक्षलवाद संपवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणांचे जाहीर अभिनंदन केले.

आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी 4 रो हाऊस बांधण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. तर, ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यांसारखे सामाजिक उपक्रमही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

vivek

Recent Posts