
Manoj Jarange Patil On Maratha Reservations : उद्यापासून उपोषण अधिक तीव्र करणार, नेत्यांवर निशाणा साधत राज ठाकरेंना ‘कुचक्या कानाचे’ तर नितेश राणेंना ‘चिचुंद्री’ संबोधले
मुंबई – मराठा समाजाला Maratha Reservation इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी सोमवारपासून पाणी पिणेही बंद करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. ‘आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,’ अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्याने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.
उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा
जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. “कुणीही दगडफेक करू नका, यामुळे समाजाची मान खाली जाईल. मुंबईतले रस्ते अडवू नका. मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अन्नछत्राच्या नावाखाली पैसे गोळा करू नका, अशी सूचनाही त्यांनी केली.
“माझे उपोषण उद्यापासून अधिक कडक होणार आहे. उद्यापासून मी पाणी पिणे बंद करणार आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या आमरण उपोषणाची गांभीर्यता दर्शवली.
राजकीय नेत्यांवर तोफ
जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा आंदोलनावर भाष्य करणाऱ्या अनेक नेत्यांचा समाचार घेतला. त्यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘कुचक्या कानाचे’ आणि ‘मानाला भुकेलेला पोरगा’ असे संबोधले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहा प्यायला गेल्यावर ते खूश होतात. लोकसभा निवडणुकीत फडणवीसांनी त्यांचा ‘गेम’ केला. राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाची फिकीर नाही. ते मराठवाड्यात कधी आलेले नाहीत,” असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षणाचे काहीच कळत नाही, तसेच त्यांनीच कुणबी पडताळणी थांबवल्या होत्या, असा आरोपही जरांगे यांनी केला. तसेच, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना ‘चिचुंद्री’ संबोधत “ते बोलतात पण त्यांना काही कळत नाही” अशी टीका केली. आंदोलन संपल्यावर नितेश राणे यांच्याकडे बघतो, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी ‘ठाकरे ब्रँड चांगला आहे,’ असे म्हणत त्यांचे कौतुक केले.


