Vasai Crime News : रॅपिडो कॅबचालकाची मोठी चोरी; फक्त 4 तासांत पोलिसांचा सापळा, 6.29 लाखांचा मुद्देमाल परत!

•भजनलाल डेअरीसमोर प्रवाशांची बॅग लंपास करून पळाला; कांदिवलीतून अटक, वॅगनर कार जप्त
वसई :- वसई तालुक्यातील नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या मोठ्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला गजाआड करत तब्बल 6 लाख 29 हजार 306 किंमतीचा सर्व मुद्देमाल परत मिळवण्यात यश मिळवले आहे.
ही घटना 2 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. नालासोपाऱ्याहून कल्याणला जात असताना रॅपिडो कॅब चालक संदेश संजय टोपरे (36 वय, रा. नालासोपारा) याने प्रवाशांना मिठाई खरेदी व वॉशरूमसाठी थांबवून, त्यांच्या बॅगेसह सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून पळ काढला. बॅगेत तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 (क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा लावण्यात आला. कांदिवली, मुंबई येथे सापळा रचून पोलिसांनी टोपरेला जेरबंद केले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यातील मारुती वॅगनर कार (5 लाख किंमत) जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 2) पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त (वसई विभाग) नवनाथ घोगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नायगाव) विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, पोलीस अंमलदार सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पाडुरंग महाले, तसेच पोलीस हवालदार अमोल बरडे यांचा महत्वाचा सहभाग होता.


