Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, वैद्यकीय उपचार घेण्यास नाकार
•मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस, मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता उपोषण, उपोषणावर ठाम
जालना :- मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. गेले 3 दिवस जरांगे पाटलांची डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. मात्र त्यांनी उपचार घेतलेले नाहीत. त्यामुळे जरांगे यांची प्रकृती आज चौथ्या दिवशी काहीशी खालावली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आपल्या या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
इकडे आमरण उपोषण सुरू आहे. सरकार मुद्दाम बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकार मुद्दामहून डाव खेळत आहे त्यांना माया असते तर दखल घेतली असती. सरकारकडून खेळवणे सुरू आहे, असे दिसते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर मराठे चांगला हिसका दाखवतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
उपचार घेण्यास नकार
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितले आहे. परंतु मी उपचार घेणार नाही. माझी भूमिका कायम आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपचारास नकार दिला. यावेळी बोलताना त्यांनी तू थोडे थांब तुला कळेल, असे म्हणत छगन भुजबळ यांनाही थेट इशारा दिला.
माझ्या समाजाची लेकरं मोठी झाली पाहिजेत यासाठीच मी जिवाची बाजी लावली आहे. आमचे काही कुणी शत्रू नाही. सगे-सोयऱ्यांच्या अमलबजावणीचा विचार करत असतील तर चांगली गोष्ट आहे. एवढा विरोध मी पत्करला आहे तो मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांसाठीच केला आहे. सगे-सोयऱ्यांची अमलबजावणी आमच्या अटींप्रमाणे केली तर आम्ही काय म्हणणार? शिवाय ते टिकवण्याची जबाबदारीही सरकारची आहे असेही मनोज जरांगे म्हणाले.