Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, प्रकृती नाजूक असल्याने रुग्णालयात दाखल

•डॉक्टरांनी दिला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला; मराठा समाजाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
छत्रपती संभाजीनगर :- मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. उपोषणानंतर त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना किमान दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
प्रकृतीची सद्यस्थिती
डॉ. विनोद चावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ केलेल्या उपोषणामुळे जरांगे पाटील यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. त्यांची स्थिती नाजूक असल्याने सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो आणि तोपर्यंत ते वैद्यकीय देखरेखीखाली असतील, असेही डॉक्टरांनी सांगितले.
जरांगे यांच्या लढ्याला यश
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदींना मान्यता मिळावी, तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी मिळावी, अशा मागण्या केल्या होत्या. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानात जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे.
जरांगे यांनी व्यक्त केला आनंद
या विजयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपला आनंद व्यक्त केला. “आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचं कल्याण झालं आहे,” असे म्हणत त्यांनी सर्व आंदोलकांचे आभार मानले. सरकारच्या घोषणेनंतर आझाद मैदानातील कार्यकर्त्यांनी ‘पाटील पाटील’ आणि ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणा देत मोठा जल्लोष केला. आंदोलकांनी या संघर्षाला अखेर यश आल्याची भावना व्यक्त केली.



