
MNS Manish Dhuri ON EC : मुंबईत ‘दुबार’ मतदारांची संख्या 11 लाख; मनसे स्टाईलने आंदोलनाचा मनीष धुरींचा निवडणूक आयोगाला इशारा
मुंबई :- राज्यातील निवडणूक यादीतील (Voters List Scam) घोटाळ्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मुंबईत आणखी एक मोठा आणि गंभीर स्वरूपाचा घोटाळा उघडकीस आणला आहे. मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी Manish Dhuri यांच्या नावानेच हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
नेमका काय आहे घोटाळा?
मनसे नेते मनीष धुरी यांच्या मूळ फोटोसमोर मतदार यादीत ‘दास भुटो सुकुमार’ असे बंगाली व्यक्तीचे नाव जोडलेले आहे, तर त्यांच्या बहिणीच्या मूळ फोटोसमोर यादीत ‘शेख निशा यतिम’ असे मुस्लिम महिलेचे नाव असल्याचे उघडकीस आले आहे. हा घोळ अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वार्ड क्रमांक 69 मध्ये यादी क्रमांक 272 मध्ये झाल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मनसेचे नेते मनीष धुरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
यापूर्वीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. महापालिकेने तशी कबुली दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली होती. आता आपल्या नावानेच बोगस मतदार तयार झाल्याचा आरोप मनसे नेत्याने केल्यामुळे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा
या संपूर्ण प्रकरणी मनसेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने जर यावर तातडीने कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिला आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे आमदार आहेत.


