MNS Shivsena Alliance : महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणाबरोबरही युतीस तयार – आदित्य ठाकरे
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील समीकरण चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या पक्षांच्या संभाव्य युतीबाबत सूचक इशारा दिला होता. त्याला आता शिवसेनेतून अधिकृत प्रतिसाद मिळू लागला असून, आता खुद्द आदित्य ठाकरेंनीदेखील मनसेला साद घातल्याचे जाहीर केलं आहे. MNS Shivsena Alliance
“महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही पक्ष आमच्याबरोबर येऊ इच्छित असेल, तर आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येण्यास तयार आहोत,” असे स्पष्ट वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी मनसेसोबत युतीच्या चर्चांना आणखी चालना दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही मनसेला टाळी दिली आहे, कारण जनतेच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचं मन देखील पारदर्शक आहे.”
युतीच्या चर्चांना बळ देत शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, अंबादास दानवे आणि सुनील प्रभूंनी यावर सकारात्मक भूमिका मांडली आहे. संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंनी स्वतः युतीसंदर्भात आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर त्यांच्या भावांनी – उद्धव ठाकरेंनीही अनुकूलता दर्शवली आहे. आता आम्ही सर्वांनीही योग्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील ही बातमी प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.”
दरम्यान, मनसेकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. तरीही, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आता राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते राजू पाटील आणि शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांनी एकत्र आंदोलन केलं होतं, जे युतीच्या ‘त्रैलर’सारखं मानलं जातं.



