नाशिकमध्ये ‘महिला राज’: भाजप देणार नव्या चेहऱ्याला संधी? महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर!

•शहराध्यक्ष सुनील केदार यांचे सूचक विधान; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्वाचा शोध; ‘या’ 9 नगरसेविकांमध्ये चुरस
नाशिक l मंत्रालयात आज झालेल्या महापौर आरक्षण सोडतीत नाशिक महानगरपालिकेचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या निर्णयामुळे नाशिक भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून, सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापौरपदाबाबत भाष्य करताना, “भाजप नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देतो, नाशिकमध्येही तेच होईल,” असे संकेत दिले आहेत. यामुळे अनुभवी नगरसेविकांसोबतच पहिल्यांदा निवडून आलेल्या महिलांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
कुंभमेळ्यासाठी ‘अभ्यासू’ चेहरा हवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन पाहता, नाशिकच्या महापौरपदी प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला आणि अभ्यासू चेहरा देण्याकडे भाजपच्या कोअर कमिटीचा कल आहे. या निकषांमध्ये हिमगौरी आडके यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. हिमगौरी आडके यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापती म्हणून आपली छाप पाडली असून, त्या आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी आहेत. आहेर कुटुंबाची भाजपशी असलेली जुनी निष्ठा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते.
नव्या चेहऱ्याची की अनुभवाची वर्णी?
भाजपकडे यंदा 16 महिला नगरसेविकांचे भक्कम संख्याबळ आहे. सुनील केदार यांच्या ‘नव्या चेहऱ्याच्या’ विधानामुळे जुन्या जाणत्या नगरसेविकांमध्ये काहीशी धाकधूक वाढली असली, तरी अंतिम निर्णय दोन दिवसांत पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
नाशिक महापौरपदासाठी चर्चेतील संभाव्य नावे
भाजपकडे अनेक सक्षम महिला पर्याय उपलब्ध असून, खालील नावांची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे:
हिमगौरी आडके: (सर्वात प्रबळ दावेदार, माजी स्थायी समिती सभापती)
डॉ. योगिता अपूर्व हिरे: (अभ्यासू आणि सुशिक्षित चेहरा)
डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी: (वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि दांडगा जनसंपर्क)
स्वाती भामरे, रोहिणी पिंगळे, चंद्रकला धुमाळ, माधुरी बोलकर, संध्या कुलकर्णी आणि प्रतिभा पवार.



