महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : कोकण, पुणे आणि सातारा येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा; मुंबईतही रात्रभर संततधार

राज्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’; जळगाव-नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस ;जनजीवन विस्कळीत, रेल्वे वाहतूक मंदावली

मुंबई :- गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक भागांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती, मात्र आता तो धो-धो कोसळत आहे. Maharashtra Weather Update

कोकण, घाटमाथ्यावर रेड अलर्ट

पुढील 24 तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस होणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना येथे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईची स्थिती आणि रेल्वेवर परिणाम

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी रात्रभर पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही प्रमाणात उशिराने सुरू आहे. मुंबईकरांनी पुढील काही तास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव आणि नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, जळगावच्या पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पळसखेडा गावात दोन्ही गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला. चिखलोड, म्हसवे आणि शेळावे या गावांमध्ये चिखली नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीतही पुराचे पाणी घुसल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत. दुसरीकडे, नांदेडमध्येही ढगफुटीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

धरणे भरली, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अमरावती जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातील जलसाठा 52 वरून 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली असली, तरी पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनले आहे.

vivek

Recent Posts