Maharashtra Weather Update : भीषण पावसाचे थैमान! कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ जारी, मुंबईही ऑरेंज अलर्टवर

Maharashtra Weather Update News : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई :- राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, बंगालच्या उपसागरात ‘विफा’ चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, मुंबई आणि ठाण्यासह पालघरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. Maharashtra Weather Update News
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तास कोकण किनारपट्टीवर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने तयारी केली आहे.
केवळ कोकणच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांमध्येही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या भागांतील नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी, वातावरण अजूनही पावसाला पोषक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजचा दिवस मुसळधार पावसाचा असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
अति मुसळधार पाऊस (रेड अलर्ट): रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
जोरदार पाऊस (ऑरेंज अलर्ट): मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा.
मध्यम ते जोरदार पाऊस (यलो अलर्ट): कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह पाऊस (यलो अलर्ट): बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.


