
Maharashtra Latest Weather Update : ‘मोथा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम; अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, नोव्हेंबर महिना उजाडला तरी पावसाचा जोर कमी होताना दिसत नाहीये. भारतीय हवामान विभागाने (IMD) आजही (1 नोव्हेंबर) अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस कोसळला असून, सकाळीही पावसाचा जोर कायम आहे, ज्यामुळे ढगाळ वातावरण आहे. Maharashtra Latest Weather Update
शेतकऱ्यांची चिंता वाढली
सततच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी राजा मोठ्या चिंतेत आहे, कारण दिवाळीनंतरही सुरू असलेल्या या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. ‘मोथा’ चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कायम असून, त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील हवामानाचा इशारा
नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील एक ते दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट आणि हाय अलर्ट जारी केला आहे:
कोकण आणि मुंबई: मुंबईमध्ये पुढील 24 तासांसाठी हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल.
मध्य आणि उत्तर महाराष्ट्र: नंदुरबार, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्येही पावसाचा जोर राहील.
विदर्भ-मराठवाडा: या दोन्ही विभागांत आजही ढगाळ वातावरण राहील आणि विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
फक्त महाराष्ट्रच नाही, तर आंध्र प्रदेशसह देशातील अनेक भागांमध्येही कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


