महाराष्ट्र

Maharashtra Special Train : भाविकांसाठी रेल्वेची आषाढी भेट! पुणे, मिरज ते नागपूर-लातूर मार्गांवर विशेष एकेरी गाड्यांची घोषणा

Ekadashi Special Train : यंदा 83 हून अधिक आषाढी विशेष गाड्या; ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध

पुणे | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने लाखो भाविकांचा ओघ सुरू असताना, त्यांच्या प्रवासाचा भार हलका करण्यासाठी मध्य रेल्वेने खास तयारी केली आहे. पुणे विभागातून पुणे-मिरज, मिरज-नागपूर आणि मिरज-लातूर या तीन नवीन विशेष एकेरी गाड्या सोडण्याची घोषणा करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, देशभरातून सध्या 83 आषाढी विशेष गाड्या विविध स्थानकांवरून पंढरपूरच्या दिशेने धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.

1.पुणे – मिरज विशेष गाडी (गाडी क्रमांक 01413)
ही गाडी 8 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पुणे स्थानकावरून सुटणार असून, दुपारी 12.30 वाजेपर्यंत मिरजला पोहचेल. गाडी लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली या स्थानकांवर थांबेल.

2.मिरज – नागपूर विशेष गाडी (गाडी क्रमांक 01213)
8 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता मिरज स्थानकावरून सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता नागपूरला पोहोचेल. या मार्गात पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, मनमाड, जळगाव, अकोला, अमरावती आदी प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.

3.मिरज – लातूर अनारक्षित विशेष गाडी (गाडी क्रमांक 01409)

6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मिरजवरून सुटणारी ही एकेरी गाडी, त्याच दिवशी रात्री 7.20 वाजता लातूर स्थानकात पोहोचेल. बार्शी, धाराशिव, येडशी, औसा रस्ता अशी ही गाडी विविध स्थानकांवर थांबेल.

या गाड्यांमध्ये वातानुकूलित, आरामदायी, द्वितीय श्रेणी व सामान्य डब्यांची सोय असून, भाविकांना ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

vivek

Recent Posts