Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाची महाराष्ट्रात एंट्री, मुंबईसह 11 जिल्ह्यांवर संकटाची छाया!

रेड अलर्टचा इशारा! अजित पवारांचा तातडीचा आदेश – “जिल्हा प्रशासन सज्ज ठेवा” मुंबईत लोकल ठप्प, रस्ते जलमय – कर्मचाऱ्यांना लवकर घरी जाण्याची मुभा
मुंबई :- मान्सूनने महाराष्ट्रात दमदार एंट्री केली असून, आभाळातून कोसळणाऱ्या धरणीगर्जेच्या पावसाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे हवामान विभागाने थेट रेड अलर्ट बजावला आहे, तर सिंधुदुर्गसाठी उद्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरला यलो अलर्ट देण्यात आला असून, अनेक जिल्हे मुसळधार पावसाच्या तडाख्याखाली आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले – “आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवा, नागरिकांचे प्राण वाचवणे हीच प्राथमिकता असली पाहिजे!” शेती, पिकांचे नुकसान, जनावरांची हानी, घरांचे नुकसान यावर तातडीने सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने लोकलसेवा उशिराने किंवा रद्द होत असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे, जेणेकरून ते सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील.
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या घाट भागांमध्येही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. संपूर्ण राज्यभरात प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



