मुंबई

Maharashtra Rain Alert : मुसळधार पावसाचा कहर! कोकण-पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले

रायगड, पुणे जिल्ह्यांत पहाटेपासून मुसळधार पाऊस; अलिबाग, माणगाव परिसरात सखल भाग जलमय

मुंबई :– राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत चालला आहे. विशेषतः रायगड व पुणे जिल्ह्यांमध्ये आज (मंगळवार) पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात मागील दोन दिवस रिमझिम स्वरूपातील पाऊस सुरू असताना, आजच्या पहाटेपासून पावसाचा जोर लक्षणीय वाढला.

पुढील पाच दिवस कोकण, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; रायगडसह तिन्ही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, पेण, माणगाव आणि रोहा तालुक्यांना मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. परिणामी अनेक सखल भाग जलमय झाले असून, वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर आता तो सक्रिय झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा धोका असून, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही पावसाचे जोरदार आगमन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा डोंगराळ भागात पावसाला सुरूवात झाली असून, सातपुडा पर्वतरांगांमध्येही पावसाचा जोर दिसून येत आहे. या भागांतील लहान नद्यांना पूर येण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0