
Pune Mumbai Expressway Accident Latest News : बोरघाटात प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटल्याने सुरक्षेचा पेच; 25 किमीच्या रांगा, एमएसआरडीसीचे प्रवाशांना प्रवास टाळण्याचे आवाहन
खोपोली | राज्याची जीवनवाहिनी समजला जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मंगळवारी सायंकाळपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. बोरघाटात प्रोपोलिन या अत्यंत ज्वलनशील गॅसचा टँकर उलटल्याने मोठी गळती सुरू झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा महामार्ग 17 तासांहून अधिक काळापासून बंद ठेवला आहे. गळती रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणेला यश न आल्याने आता या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या महाकोंडीमुळे महामार्गावर 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
युद्धपातळीवर प्रयत्न, पण आव्हान कायम
मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास बोरघाट टॅब हद्दीत हा अपघात झाला. टँकर पलटी झाल्याबरोबर त्यातून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाली. प्रोपोलिन गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने लहानशा ठिणगीनेही मोठा स्फोट होण्याचा धोका आहे. ही भीषणता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरुवातीला पुणे-मुंबई वाहिनी बंद केली आणि नंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण महामार्गच वाहतुकीसाठी रोखून धरला आहे. सध्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गळती रोखण्याचे काम सुरू असले, तरी त्याला यश मिळण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.
वाहतूक पर्यायी मार्गावर, तरीही कोंडी कायम
महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आल्याने वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे. मात्र, तिथेही वाहनांचा भार वाढल्याने प्रचंड कोंडी झाली आहे. एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळतीचे काम अत्यंत आव्हानात्मक आहे. जोपर्यंत गळती पूर्णपणे थांबत नाही आणि धोका टळत नाही, तोपर्यंत महामार्ग सुरू करणे अशक्य आहे. गळती थांबल्यानंतरही सुरुवातीला केवळ एक-एक मार्गिका प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना ‘रेड अलर्ट’: प्रवास टाळा!
गेल्या 17 तासांपासून सुरू असलेल्या या खोळंब्यामुळे रुग्ण, वृद्ध आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत. महामार्गावर अन्न आणि पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एमएसआरडीसीने वाहनचालकांना आजचा मुंबई-पुणे प्रवास शक्यतो टाळण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. अत्यंत गरज असल्यास ताम्हिणी घाट किंवा माळशेज घाटासारख्या लांबच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


