मुंबई

Maharashtra Politics : उपराष्ट्रपती निवडणुकीत ‘ठाकरे सेना’ ‘इंडिया’ आघाडीसोबत; फडणवीसांची विनंती धुडकावली

भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा नाही, ‘इंडिया’ आघाडीच्या सुदर्शन रेड्डींना पाठिंबा जाहीर

मुंबई :- देशात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही भाजप आघाडीचा उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याउलट, ‘ठाकरे सेना’ ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती, परंतु ‘ठाकरे सेना’ ‘इंडिया’ आघाडीचा अविभाज्य भाग आहे. ‘आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला आहे आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत,’ असे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत असल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले आहे.

पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावरून राऊत आक्रमक’

उपराष्ट्रपती निवडणुकीसोबतच, संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामन्यांना परवानगी दिल्याबद्दल जोरदार टीका केली. ‘हिंदुस्तानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान, त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त जन्मालाच आला नाही. पण त्यांनी काल त्यांच्या सरकारने एशिया चषक क्रिकेट सामने खास करून पाकिस्तान बरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला, हा प्रकार धक्कादायक आहे,’ असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘मी पंतप्रधानांना विचारतो, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची जी काही आपल्याला खुमखुमी किंवा खाज आहे त्यासाठी पहेलगाममध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना विचारलं का? त्यांच्या भावना समजून घेतल्यात का? आपली अशी कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहात?’, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यावरून आता भाजप आणि ठाकरे गटात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

vivek

Recent Posts