महाराष्ट्र

Maharashtra Politics : राहुल गांधींचे आरोप निराधार; निवडणूक आयोगाने दिले सोशल मीडियावरून प्रत्युत्तर

•मतदार यादीतून नावे वगळल्याच्या आरोपावरून राजकारण तापले, आळंद आणि राजुरी मतदारसंघांचा हवाला, आयोगाने म्हटले- ‘प्रयत्न अयशस्वी’

ANI :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधून हजारो मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप केल्याने देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. या आरोपांवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर दिले असून, राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींचे आरोप आणि पुरावे

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांनी कर्नाटकातील आळंद आणि महाराष्ट्रातील राजुरी मतदारसंघांची उदाहरणे देत सांगितले की, काही विशिष्ट गटांतील, जसे की अल्पसंख्य, दलित आणि मागासवर्गीय, मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत. यासाठी एकाच क्रमांकावरून अनेक ‘डिलिशन’ अर्ज भरले गेले. यासाठी एका मध्यवर्ती कॉल सेंटरचा वापर केला गेला असून, ज्या नंबरवरून हे अर्ज केले गेले, त्यांच्या मालकांना याची कल्पनाही नव्हती, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने म्हटले की, कोणतीही सामान्य व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने नाव हटवू शकत नाही. नाव वगळण्यापूर्वी संबंधित मतदाराला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. आयोगाने आळंदमधील घटनेचा उल्लेख करत सांगितले की, 2023 मध्ये तेथील मतदार यादीतून नावे वगळण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो अयशस्वी ठरला. याप्रकरणी आम्ही एफआयआर देखील दाखल केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपही निराधार आणि अयोग्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडून 8 दिवसांत ‘डेस्टिनेशन आयपी ॲड्रेस’ आणि ‘ओटीपी ट्रेल’ देण्याची मागणी केली आहे. कर्नाटकातील सीआयडीने यासंदर्भात 18 पत्रे पाठवूनही आयोगाने उत्तर दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. जर 8 दिवसांत ही माहिती दिली नाही, तर केंद्रीय निवडणूक आयोग मतचोरांना आणि लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असा संदेश देशातील तरुणांमध्ये जाईल, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

vivek

Recent Posts