Maharashtra Politics : निवडणुकांपूर्वी विरोधकांची वज्रमूठ! ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाच्या दारी

•उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आजच्या शिष्टमंडळातही कायम; शरद पवार मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर!
मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरुद्ध (Election Commission) आपली ‘वज्रमूठ’ कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहे.
काल (मंगळवारी) शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख विरोधी नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, मतदार नोंदणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आयोगाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.
शरद पवार आज शिष्टमंडळात गैरहजर
आजच्या दुसऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र उपस्थित नसणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शरद पवार थोड्याच वेळात पुण्याकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे ते शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाकडे जाणार नाहीत.
मात्र, त्यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही बंधू आजच्या शिष्टमंडळातही एकत्र असणार आहेत.
मंगळवारी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती. ही चर्चा अपुरी राहिल्यामुळे आज सकाळी मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत उर्वरित मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी मतदारांच्या मुद्द्यावर घेतलेला आक्रमक पवित्रा महत्त्वाचा मानला जात आहे.


