Bangladeshi Illgeal Migrants : आता मालकही होणार जेलबंद! बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर होणार थेट कारवाई

Government Will Take Action On Illegale Migrants : राज्य सरकारचे कठोर परिपत्रक; स्वस्त मजुरांच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यांची खैर नाही; बनावट कागदपत्रे रोखण्यासाठी ‘ऑनलाइन पडताळणी’ अनिवार्य
मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ज्या बांधकाम साइट्स, कारखाने किंवा छोट्या उद्योगांमध्ये बांगलादेशी घुसखोर काम करताना आढळतील, त्या आस्थापनेच्या मालकावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. गृह विभागाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, वैयक्तिक फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
‘राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च’; व्यावसायिकांना प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मुंबईतील विकासक आणि कंत्राटदारांना त्यांच्याकडे एकही बांगलादेशी कामगार नसल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
प्रामुख्याने बांधकाम मजूर, मेकॅनिक, वेल्डर, वाहन चालक, प्लंबर आणि हॉटेलमधील वेटर या क्षेत्रांवर सरकारचे विशेष लक्ष असेल. जर वरील कामांवर संशयास्पद नागरिक आढळला, तर “आम्हाला माहिती नव्हती” असे सांगून मालकांना सुटका करून घेता येणार नाही. त्यांनाच यासाठी जबाबदार धरले जाईल.
बनावट कागदपत्रांना बसणार ‘ऑनलाइन’ चाप
घुसखोर नागरिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर शासकीय दस्तऐवजांमध्ये छेडछाड करत असल्याचे तपासात समोर आले आहे. यावर तोडगा म्हणून सर्व प्रशासकीय विभागांना ‘ऑनलाइन पडताळणी प्रणाली’ विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या प्रणालीमुळे अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे ज्या विभागाने जारी केली आहेत (उदा. निवडणूक आयोग किंवा महापालिका), तिथूनच ती खरी आहेत की नाही, याची खात्री तात्काळ करता येईल.
गावपातळीवर ‘पोलीस पाटील’ अलर्ट
शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही हे घुसखोर पसरण्याची भीती असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांना विशेष आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोणताही संशयास्पद नागरिक दिसल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस पाटलांना देणे बंधनकारक आहे. पोलीस पाटील ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला कळवतील, जेणेकरून ग्रामीण भागातील सुरक्षितता अबाधित राहील.


