मुंबई

Vidhansabha Latest Update : नोव्हेंबरमध्ये ‘मिनी विधानसभा’; 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या 27 ऑक्टोबरला जाहीर होणार

•राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रक्रिया सुरू

मुंबई :- महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी गट आणि गणनिहाय अंतिम मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर लगेचच प्रत्यक्ष निवडणूक नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांची निवडणूक होईल. त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जातील.

कसा असेल मतदार यादीचा कार्यक्रम?

या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची विधानसभा मतदार यादी विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार, 8 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार केली जाईल. त्यानंतर 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान या यादीवर हरकती आणि सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध केली जाईल, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

भंडारा, गोंदिया, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळून राज्यातील उर्वरित 32 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख घोषित केली जाईल.

राजकीयदृष्ट्या निवडणुका महत्त्वाच्या

या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ निवडणुका मानले जाते, कारण यातून ग्रामीण भागातील मतदारांचा राजकीय कौल स्पष्ट होतो. ‘महायुती’ आणि ‘महाविकास आघाडी’ या दोन्ही गटांनी या निवडणुका आघाडीत लढवायच्या की स्वतंत्रपणे, याचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेतला जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्याच्या ग्रामीण राजकारणात मोठा धुरळा उडणार हे निश्चित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0