
Sanjay Raut At Shivaji Park : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज्यसभा खासदाराकडून ‘राजकीय सक्ती’ची विश्रांती मोडली; स्मृतीस्थळी दर्शन
मुंबई :- ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आणि विरोधकांना एकहाती शिंगावर घेणारे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत Sanjay Raut हे गेल्या काही दिवसांपासून सक्तीची विश्रांती घेत होते. गंभीर आजारामुळे डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

या सल्ल्यानुसार, संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबर रोजी जाहीर पत्र लिहून पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच विश्रांती घेत होते.
मात्र, सोमवार 17 नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने, संजय राऊत यांनी आपल्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता विश्रांतीचा नियम मोडला. ते थेट दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.
‘साहेबां’वरील निस्सीम प्रेम आणि निष्ठा जपण्यासाठी संजय राऊत यांनी डॉक्टरांचा सल्ला तात्पुरता बाजूला ठेवत स्मृतीस्थळी हजेरी लावली. त्यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
स्मृतिदिनी संजय राऊत यांचे ट्विट
ज्यांच्यामुळे मी घडलो
असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना!
असा पुरुष सिंह होणे नाही!
मराठी माणसाने एकजुटीने राहावे
आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली!साहेब,जय महाराष्ट्र!


