Maharashtra News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर उद्या भाजपमध्ये! राजकीय वर्तुळात ‘यू-टर्न’ची चर्चा

Maharashtra Political Update : पाच वेळा आमदार, एकवेळ खासदार, माजी मंत्र्याचा भाजप प्रवेश; समर्थकांसह मुंबईकडे रवाना
मुंबई :- परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकरSuresh Warpudkar यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या, मंगळवारी (दि. 29 जुलै) ते मुंबईत भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करत आहेत. त्यांच्या या पक्षबदलामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठे बदल अपेक्षित असून, वरपूडकर यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. Maharashtra Political Update
सुरेश वरपूडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी नाव आहे. 1980 च्या दशकात अपक्ष आमदार म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीआधी त्यांनी दीर्घकाळ सिंगणापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते याच मतदारसंघातून अनेकदा विजयी झाले. 1998 च्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा पराभव करत खासदार म्हणून निवडून आले.
शरद पवार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा पवारांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्या बाजूने उभे राहणारे वरपूडकर हे पहिले खासदार होते. पाच वेळा आमदार, एक वेळ खासदार, माजी मंत्री आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या वरपूडकर यांना जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते मानले जाते.
सुरेश वरपूडकर यांनी सुरुवातीला दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि या पक्षात ते चांगलेच स्थिरावले. त्यांच्या रूपाने काँग्रेसलाही जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक ताकद असलेला नेता मिळाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरपूडकर पाथरी मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यानंतर जिल्ह्याच्या काँग्रेसची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आली होती.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वरपूडकरही काँग्रेस सोडतील अशी चर्चा होती, परंतु ते काही महिने काँग्रेसमध्येच राहिले. तरीही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, अखेर सत्ताधारी पक्षातच जायचे तर शिंदे यांच्या सेनेत जाण्यापेक्षा थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय वरपूडकरांनी घेतला. संपूर्ण हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घालवलेल्या वरपूडकरांनी आपल्या राजकीय आयुष्याच्या उत्तरार्धात थेट भाजपमध्ये प्रवेश करून एक मोठा ‘यू-टर्न’ घेतला आहे.
सध्या जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे आहे. वरपूडकरांच्या प्रवेशाला बोर्डीकरांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, वरपूडकर यांनी भाजपच्या नेतृत्वाची भेट घेतली तेव्हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बोर्डीकरही उपस्थित होते, त्यामुळे हा मुद्दाही निकाली निघाल्याचे बोलले जात आहे. वरपूडकरांच्या प्रवेशाने परभणी जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढणार असून, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.



