Maharashtra News : महाराष्ट्रातील भाजप खासदारांची पंतप्रधानांसोबत ‘चहा पे चर्चा’! – संसदीय कामकाजात गैरहजेरीवरून मोदींनी व्यक्त केली नाराजी

Maharashtra MP Meet PM Modi : लोकसभेतील गणपूर्ती न झाल्याबद्दल खासदारांना कानपिचक्या; ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ सुधारण्याचे निर्देश; महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा घेतला आढावा
ANI :- महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. संसदीय कामकाजातील खासदारांचा सहभाग, सरकारची प्रतिमा आणि राज्यातील राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.



गणपूर्ती न झाल्याबद्दल नाराजी
या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू काल संसदेत घडलेली घटना होती. काल लोकसभेमध्ये गणपूर्ती (कोरम) पूर्ण होऊ शकली नव्हती, त्यामुळे बेल वाजवण्याची वेळ आली होती. सभागृहात किमान 50 खासदार उपस्थित असणे आवश्यक असताना सत्ताधारी पक्षाचे खासदार कमी संख्येने उपस्थित होते. लोकसभेचा कोरम पूर्ण न होणे हे सत्ताधारी पक्षाचे अपयश समजले जाते. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच वरिष्ठ मंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती.
पंतप्रधानांचे निर्देश
मोदींनी सर्व खासदारांना संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग घेण्याचे आणि सभागृहात उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ व्यवस्थित असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
बैठकीतील चर्चा
सकाळी 10 वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत खासदारांची पहिली बैठक झाली, त्यानंतर 10 वाजून 25 मिनिटांनी सर्व खासदार पंतप्रधानांच्या दालनात दाखल झाले.संसदीय कामकाजातील सहभाग वाढवणे, सरकारची प्रतिमा, खासदार करत असलेली कामे आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खासदारांची मतं जाणून घेणे.भविष्यात होणाऱ्या संभाव्य मंत्रीमंडळ बदलाच्या पार्श्वभूमीवर, खासदारांचे सध्याच्या मंत्रीमंडळाविषयी मत काय आहे, याचाही कानोसा पंतप्रधानांनी घेतल्याची माहिती आहे.
भविष्यात इतर राज्यांतील भाजप खासदारांशी देखील पंतप्रधान मोदी अधिवेशनादरम्यान अशाच प्रकारे संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.



