Bhayandar Police News : 9 वर्षांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bhayandar Police Latest Crime News : बँकेला नकली सोन्याच्या नावाखाली 75 लाखांना गंडवणारा आरोपी नालासोपाऱ्यातून ताब्यात
भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1, काशिमीराच्या पथकाने मोठी कामगिरी बजावत एका बँक फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल नऊ वर्षांनंतर अटक केली आहे. हा आरोपी स्वतःचे नाव बदलून नालासोपाऱ्यात राहत होता. Bhayandar Latest Crime News
नेमका गुन्हा काय?
भाईंदर (पश्चिम) येथील कॅथलिक सिलियन बँक लिमीटेडमध्ये 15 डिसेंबर 2012 ते 14 जून 2016 या काळात मोठा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी एकूण सहा आरोपींनी बँकेच्या मॅनेजरशी संगनमत करून बनावट सोने तारण ठेवून 75 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला गोपाल राधेश्याम नाग हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
पोलीस पथकाची शोध मोहीम
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा कक्ष-1 च्या तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला असता, तो नावात बदल करून गोपाल राधेश्याम चौरसिया या नावाने नालासोपारा परिसरात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला. अखेर, 30 ऑगस्ट 2025 रोजी आरोपी गोपाल नाग उर्फ चौरसिया (वय 42) हा मनवेलपाडा, विरार (पूर्व) परिसरात आढळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखा, मीरा-भाईंदर, वसई-विरार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सपोनि सचिन सानप, पोउपनि संदीप शिंदे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.



