मुंबई

Maharashtra Mega Bharti : राज्यात ‘मेगा भरती’ची तयारी; अनुसूचित जमातींच्या रिक्त पदांवर भरती लवकरच

•150 दिवसांच्या कृती कार्यक्रमात शासनाचे लक्ष्य ठरले; फडणवीसांनी विधानसभेत दिला इशारा

मुंबई | राज्यात सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत संकेत दिले की, राज्यात लवकरच मेगा भरती करण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली पदेही भरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे आमदार भीमराव कराम यांनी अनुसूचित जमातींसाठीच्या रिक्त पदांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, नियुक्ती प्रक्रिया, अनुकंपा तत्वावरील भरती, नियम सुधारणा आदी कामे पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येईल.”

फडणवीसांनी सांगितले की, राज्यात मागील काळात 25 हजार पदांची घोषणा करून प्रत्यक्षात 1 लाखांहून अधिक पदांची भरती करण्यात आली होती. अनुसूचित जमाती वर्गातील 6,860 अधिसंख्य पदांवर जात वैधता प्रमाणपत्र न सादर करू शकलेले कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्यावर मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

जात वैधता प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून अभिलेख प्रणाली उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी सुलभ होईल. तसेच जात वैधता समित्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सचिवांचा गट स्थापन केला जाणार आहे.

फडणवीसांनी स्पष्ट केले की, अनुसूचित जमातींच्या 1.55 लाख राखीव पदांपैकी सध्या केवळ 1 लाख पदेच भरली गेली असून उर्वरित पदे तत्काळ भरण्यावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात आदिवासींसाठी केवळ 29 पदे रिक्त असून त्यांच्यावरही लवकरच कार्यवाही होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांची पदे वारसा हक्काने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

vivek

Recent Posts