
Maharashtra Government Latest News : 8 हजार कोटींचे पॅकेज पोहोचले; एकूण 19 हजार कोटींचे पॅकेज; ‘तुळजापूर-सोलापूर’ रेल्वे मार्गाला मंजुरी
मुंबई :- राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आज आणखी 11 हजार कोटी रुपयांचे रिलीफ पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
15 दिवसांत पैसे जमा होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, अतिवृष्टीग्रस्तांसाठी आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे पॅकेज रिलीज करण्यात आले असून, जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत.
विशेष बाब म्हणून मंजुरी: आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत 11 हजार कोटी रुपये रिलीज करायला मान्यता देण्यात आली आहे. हे पैसे बजेटमधील नसल्याने त्यांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.
अल्टिमेटम: मुख्यमंत्र्यांनी हे पैसे पुढच्या 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. “पुढच्या 15 ते 20 दिवसांत 90 टक्के शेतकरी कव्हर करण्याचा प्रयत्न करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतमाल खरेदीचेही आवाहन
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कुठे विकावा याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आहे. सगळीकडे रजिस्ट्रेशन सुरू करत आहोत. व्यापाऱ्याकडून हमीभाव मिळत असेल, तर शेतकऱ्यांनी त्याला माल विकावा; पण कमी भाव मिळत असेल तर सरकाराला विकावा,” असे आवाहन त्यांनी केले.
तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाला मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुळजापूर-सोलापूर-धाराशिव या सुधारित रेल्वे आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. 3295 कोटी रुपयांच्या या आराखड्यात 50 टक्के वाटा राज्य सरकार आणि 50 टक्के वाटा केंद्र सरकार उचलणार आहे.
आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष सल्ला
मतदार यादीतील कथित घोळावरून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सादरीकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये. राहुल गांधी जशी मोठी स्क्रीन लावतात, येरझाऱ्या घालतात, ‘खोदा पहाड, चुहा भी नही निकला’ असं असतं. काल आदित्य ठाकरेंनी सुद्धा तेच केलं. त्यांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिलेली आहेत. आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी राहुल गांधी बनू नये.”
दरम्यान, वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची (VSI) कोणतीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


