मुंबईठाणे
Trending

Maharashtra Election : राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स 22 जानेवारीला मिटणार! मंत्रालयात निघणार आरक्षणाची सोडत

Maharashtra Municipal Election Latest News :आरक्षणाची चक्राकार पद्धत बदलण्याची शक्यता; मुसंडी मारलेल्या भाजपसह सर्वच पक्षांचे लक्ष मुंबईच्या मंत्रालयाकडे

मुंबई l राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. नगरविकास विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाणार आहे. राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रक्रियेत राज्यातील सर्व बड्या शहरांच्या ‘प्रथम नागरिक’ पदाचे आरक्षण निश्चित होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या शहरात कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार, याचा फैसला या दिवशी मंत्रालयातून होईल.

यावेळची आरक्षण सोडत विशेष ठरणार आहे, कारण महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. जुन्या पद्धतीऐवजी पुन्हा ‘ओपन’ प्रवर्गापासून सुरुवात करत चक्राकार (Cyclic Method) पद्धतीने आरक्षण काढले जाण्याची दाट शक्यता आहे. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची समान संधी मिळावे, यासाठी ही पद्धत राबवण्यात येते. सध्या कायद्यात एससी, एसटी, महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी रोटेशन पद्धत असली, तरी नियमातील नव्या बदलामुळे आरक्षणाचे चक्र नव्याने सुरू झाल्यास अनेक राजकीय गणिते उलटीपालटी होऊ शकतात. यामुळेच सर्वच पक्षांच्या धुरिणांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

अलीकडेच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राज्यातील 19 महापालिकांमध्ये विजयाची मोहोर उमटवत आपली ताकद सिद्ध केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का देत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरच सत्तास्थापनेचे अंतिम गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीच्या या सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0