Maharashtra Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाची ‘डेडलाईन’! – 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश

High Court On Maharashtra Election : निवडणुका पुढे ढकलल्यास मोठी कारवाई; 2 डिसेंबरच्या नगरपालिका/नगरपंचायतींच्या मतमोजणीसाठी 21 डिसेंबरची तारीख निश्चित, न्यायालयाचा कोणताही आदेश प्रक्रिया थांबवू शकणार नाही
ANI :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर अनिश्चिततेचे ढग अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेने दूर झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या मुदतीनंतर निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
मतमोजणीची तारीख निश्चित:
सर्वोच्च न्यायालयाने 2 डिसेंबर रोजी झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या मतमोजणीबाबतही स्पष्टता दिली आहे.
21 डिसेंबरलाच मतमोजणी
न्यायालयाने या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असल्याचे अधोरेखित केले. 21 तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला असून, ही तारीख कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलली जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयांना निर्देश
न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवरील अनिश्चितता पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. उच्च न्यायालयांमधील विविध याचिका, प्रकरणे किंवा खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नागपूर, औरंगाबाद किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशामुळे निवडणुकीची प्रक्रिया लांबणीवर पडणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्पष्ट दिशा मिळाली असून, निवडणुका वेळेतच पार पडणार असल्याचा नागरिकांना विश्वास मिळाला आहे.



