Manikrao Kokate Rummy Video : ‘रमी’वरून कोकाटेंचा सत्तेत कल्ला!व्हायरल व्हिडीओमुळे मंत्रिमंडळात गोंधळ, राजीनाम्याची मागणी जोरात

Manikrao Kokate Rummy Video : शिंदेंचं प्रतिकूल मत, ‘भिकारी’ वक्तव्यावरूनही संताप
मुंबई :- राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate Rummy Video अधिवेशनादरम्यान मोबाईलवर ‘रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सत्ताधारी असो वा विरोधक – सर्व स्तरातून कोकाटेंच्या वर्तनावर टीकेचा भडिमार सुरू असून, राजीनाम्याची मागणी उफाळून आली आहे.
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलं मत मांडत कोकाटेंच्या स्पष्टीकरणाची वाट पाहण्याचा सूर आळवला आहे. “ते म्हणाले आहेत की, हे खरे नाही. त्यामुळे तपासून पाहू, दूध का दूध, पाणी का पाणी होईल,” असे ते म्हणाले. मात्र याच वेळी कोकाटेंनी केलेल्या “शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे” या वादग्रस्त विधानालाही शिंदेंनी विरोध दर्शवला. “असे बोलू नये, ते बोलले असतील तर खेदजनक आहे,” असे त्यांचे स्पष्ट मत होते.
माणिकराव कोकाटे मंत्रीपद स्वीकारल्यापासून विविध कारणांनी चर्चेत राहिले आहेत. यापूर्वीही त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले होते. आता या व्हिडिओ प्रकरणामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार अडचणीत आली आहे.
“कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार का?” या प्रश्नावर शिंदेंनी बॉल अजित पवारांच्या कोर्टात टाकला. “कोकाटे हे त्यांच्या पक्षाचे आहेत. अजित पवार यांची भूमिका काय आहे, ते पाहून निर्णय होईल,” असं ते म्हणाले.


