महाराष्ट्रमुंबई
Trending

Gajanan Kale : ठाकरे बंधूंच्या एकतेवर भाजपची पोटदुखी! मनसे नेते गजानन काळेंचा घणाघात : “भाजपला अपचन, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा!”

Gajanan Kale On Ashish Shelar : भाषा की सत्ता? ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप–प्रत्यारोप सुरूच

नवी मुंबई | मुंबईच्या वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शनिवारी पार पडलेल्या शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. हिंदी सक्तीच्या आदेशावरून महायुती सरकारने घेतलेला माघार निर्णय साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या या विजयी मेळाव्यात एकत्र आलेले ठाकरे बंधू – उद्धव आणि राज ठाकरे – जवळपास दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर झळकले.

या ऐतिहासिक क्षणाने मराठी जनतेत उत्साह संचारला असतानाच, या युतीच्या राजकीय संभावनांवरून विरोधकांची तोंडे उघडली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आणि तिथूनच सुरु झाला एक नव्या आरोप-प्रत्यारोपाचा खेळ!

भाजप नेते आशिष शेलार यांनी युतीवर तिखट प्रतिक्रिया देत, “ही युती भाषेसाठी नाही, तर सत्तेसाठी आहे. मुंबईची सत्ता मिळवण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे. भाऊबंदकीचं हे राजकारण आहे,” असे म्हणत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. शेलारांच्या मते, मराठी भाषेच्या मुद्द्याआड निवडणूक गणितं साधण्याचा हा प्रयत्न आहे.

परंतु शेलारांच्या या टीकेला मनसे नेते गजानन काळे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं —”शेलार मामाला पोटदुखी सुरू झाली आहे. भाजपने पक्ष फोडले, भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून घेतलं, कुटुंबं फोडली, युती केल्या – ते चालतं. पण मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले की अपचन होतं? अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!”

काळेंच्या या थेट शब्दांमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू असून, अनेकांनी युतीचं स्वागत करत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0