Maharashtra Covid Update : राज्यात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ,24 तासांत 114 नवीन रुग्ण; मृतांची संख्या 18 वर

Maharashtra Latest Covid Patient News : 681 रुग्ण बरे, 577 रुग्णांवर घरी उपचार सुरू
मुंबई | राज्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस चढत असून, गेल्या 24 तासांत राज्यात नव्याने 114 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 1,276 वर पोहोचली आहे. मुंबईतील परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असून येथे 612 रुग्णांची नोंद आहे. शुक्रवारी करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला असून मृतांची एकूण संख्या 18 वर गेली आहे.
शुक्रवारी नोंदवलेले 114 नवीन रुग्ण राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात आढळून आले. पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 42 रुग्ण, मुंबईत 37, मीरा भाईंदर व पनवेलमध्ये प्रत्येकी 7, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, नवी मुंबईत 4, कल्याणमध्ये 3, तर पुणे जिल्हा ग्रामीण भागात 2 रुग्ण आढळले. ठाणे, कोल्हापूर, सांगली, परभणी, सातारा व छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
राज्यात आतापर्यंत 15,510 करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील 1,276 रुग्ण बाधित आढळले आहेत. यापैकी 681 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 577 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना सौम्य लक्षणे असल्याने बहुतेक जण होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत.



