
Maharashtra Latest News : राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद; 15 फेब्रुवारीपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई | राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुराळा शांत होत असतानाच आता ग्रामीण भागातील राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार असून, यामध्ये पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. या घोषणेमुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. ZP Maharashtra Election
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. काल, 12 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही मागणी मान्य करत 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आयोगाने तातडीने हालचाली करत आजचा मुहूर्त निश्चित केला आहे.
निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात ज्या 12 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या आत आहे, त्यांचा प्रामुख्याने समावेश असेल. यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने, त्या ठिकाणी निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाण्याची चिन्हे आहेत.
आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख, अर्जांची छाननी, माघारीची मुदत आणि प्रत्यक्ष मतदानाची तारीख जाहीर करतील. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका मतदानानंतर अवघ्या काही दिवसांतच ग्रामीण महाराष्ट्रातही मतदानाची धामधूम सुरू होणार आहे. या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचणार असून, इच्छुकांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे.


