Mahaparinirvana Diwas 2025 : 69 व्या महापरिनिर्वाण दिनासाठी ‘मिनी सिटी’ सज्ज! – चैत्यभूमीवर लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी पालिका युद्धपातळीवर तयार

Mahaparinirvana Diwas 2025 : शिवाजी पार्कवर 1 लाख चौ. फुटाचा वॉटरप्रूफ मंडप, 585 वैद्यकीय कर्मचारी आणि 500 हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स; मुंबईत ‘ज्ञानाचे भांडार’ अवतरले
मुंबई/दादर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Mahaparinirvana Diwas 2025 त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह या प्रमुख ठिकाणी पालिकेकडून आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क मैदान येथे अनुयायांना तात्पुरता निवारा मिळावा यासाठी 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर भव्य वॉटरप्रूफ निवासी मंडपाची सोय करण्यात आली आहे. या निवासी मंडपात अनुयायांना आदरांजलीचे क्षण पाहता यावेत, यासाठी 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत.
स्वच्छता, आरोग्य आणि स्नानाची सोय
प्रशासनाने स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिले असून, परिसराची स्वच्छता राखण्यासाठी 527 कामगार विविध संयंत्रांसह प्रत्येक सत्रात अविरत कार्यरत असतील.
अनुयायांच्या सुविधेसाठी दर्शन रांगा आणि मुख्य मार्गांवर एकूण 150 फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत, तर मैदान परिसरात 254 आणि अभिवादन रांगेत 10 अशी शौचालये असणार आहेत. महिलांसाठी खास ‘पिंक टॉयलेट्स’ची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, नळ व शॉवर सुविधेसह 284 तात्पुरती स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. 30 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादन टाकण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी 20 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, तर वैद्यकीय सेवा देण्यासाठी 585 तज्ज्ञ मनुष्यबळ कार्यरत असेल. तसेच, डेंग्यू व हिवताप याबाबत जनजागृतीसाठी विशेष कक्ष आणि किटकनाशक फवारणीसाठी मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.
सुरक्षा आणि विशेष सुविधा
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे, मेटल डिटेक्टर्स, बॅग स्कॅनर्स आदींसह नियंत्रण कक्ष आणि निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका (ICU Ambulance) आणि दादर चौपाटी येथे बचाव कार्यासाठी बोट यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशोक स्तंभ परिसरात 70 हून अधिक पोलीस आणि समता सैनिक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 16 टँकर आणि 254 नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी खास ‘हिरकणी कक्ष’ (Mother & Child Room) आणि मोबाईल चार्जिंगसाठी विशेष सुविधा केंद्र उभारले गेले आहे.
शिवाजी पार्कवर पुस्तकांचे महासागर
यावेळी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 500 हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी करत असल्याने या दोन दिवसांत करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा पुस्तक विक्रेत्यांनी केला आहे. दिल्ली, नागपूर, पुणे, परभणी यासह देशभरातील विक्रेत्यांनी येथे ‘ज्ञानाचे भांडार’ उघडले आहे.



