कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक
महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.
ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली. तेव्हा श्री विष्णूंनी दोन काशी निर्माण केल्या. एक उत्तर काशी जी काशी विश्वेश्वर अर्थात महादेवांना समर्पित केले. व दुसरे दक्षिण काशी सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीला समप्रित केले. दक्षिण काशी हे महालक्ष्मीला अत्यंत प्रीय असल्याने आदी व अनंत काळासाठी ती इथेच वास्तव्यास राहिली.
इतिहास
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले.ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्त होते. आपणास देवीचा “वरप्रसाद” मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.
काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. 1722 मध्ये दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.
हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती 1.22 मीटर उंच असून ती एका 0.91 मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.
प्राध्यापक प्रभाकर माळशे म्हणतात, “करवीराचे नाव आजही स्थानिक पातळीवर कोल्हापूर शहर दर्शविण्यासाठी वापरले जाते”.
छत्रपतींचा काळ
पुर्वी महाराष्ट्रात मोगलाईची हुकुमत होती. हिंदूंचे सर्व मंदिरे तोडून मशिद बांधले जात होते. याच काळात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ असलेलं कोल्हापूर करवीर निवासिनी सर्वस्याद्या शक्ती त्रिगुणात्मक स्वरूपीणी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरावर ही संकट आले. मोगलांच्या विध्वंसामुळे देवी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होईल या भयाने मूर्ती अनेक वर्षे एका पुजाऱ्याच्या घरात लपवून ठेवली गेली. 1720 साली श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. सन 1715 साली नरहरभट सावगावकर यांना महालक्ष्मी देवीने मूर्ती कुठे आहे याचा दृष्टांत दिला. नरहरभट यांनी तत्कालीन करवीर श्रीमंत छत्रपती महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगितले. महाराजांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे (गजेंद्रगडकर) यांनी 26 सप्टेंबर 1715 रोजी विजया दशमीला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना केली. आज या घटनेला 305 वर्षे पुर्ण होत आहेत.
अंबाबाई मंदिरातला किरणोत्सव
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :-
1.31 जानेवारी (आणि 9 नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात.
2.1फेब्रुवारी (आणि 10 नोव्हेंबर) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात.
3.2 फेब्रुवारी (आणि 11 नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.
या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.