नागपूर

Nagpur News : नागपुरात अजब राडा! अपक्ष उमेदवाराला मतदारांनीच घरात कोंडले; ‘माघार घ्यायची नाही’ म्हणत समर्थकांचा घराला बाहेरून कुलूप

•भाजपच्या दबावामुळे अर्ज मागे घ्यायला निघाले होते किसन गावडे; कार्यकर्त्यांच्या रोषामुळे उमेदवाराची त्रेधातिरपीट!

नागपूर | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, उपराजधानी नागपुरात एका अनोख्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रभाग क्रमांक 13 (ड) मधील अपक्ष उमेदवार किसन गावडे यांना त्यांच्याच प्रभागातील नागरिकांनी आणि समर्थकांनी चक्क राहत्या घरात बंद करून घराला बाहेरून कुलूप ठोकले. “तुम्ही निवडणूक लढलीच पाहिजे,” असा हट्ट धरत शेकडो कार्यकर्त्यांनी गावडे यांच्या घराबाहेरील अंगणात ठिय्या मांडला.

नेमका पेच काय?

किसन गावडे यांना प्रभाग 13 मधून भाजपकडून ‘एबी फॉर्म’ देण्यात आला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव त्यांचा हा फॉर्म रद्द झाला. यामुळे संतप्त झालेल्या गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गावडे यांची समजूत काढत त्यांना आज माघार घेण्याचे निर्देश दिले होते. पक्षादेश पाळण्यासाठी गावडे दुपारी घराबाहेर पडणार होते, मात्र त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरालाच वेढा घातला.

‘घराला कुलूप आणि घराबाहेर घोषणा’

गावडे यांनी अर्ज मागे घेऊ नये, यासाठी समर्थकांच्या भावना कमालीच्या उग्र होत्या. “उमेदवारी मागे घ्यायची नाही, आम्हाला तुम्हीच हवे आहात,” असे म्हणत कार्यकर्त्यांनी गावडे यांना घरात शिरण्यास भाग पाडले आणि बाहेरून दाराला लॉक लावले. बराच वेळ हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. घराबाहेर मोठ्या संख्येने गोळा झालेल्या समर्थकांनी आपल्या लाडक्या उमेदवाराच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

उमेदवाराची हतबलता; “कार्यकर्त्यांचा सन्मान करतो!”

घरातूनच प्रतिक्रिया देताना किसन गावडे म्हणाले, “2017 मध्ये या भागातून जे उमेदवार दिले होते, ते बाहेरचे होते. आता या भागातील किमान एक तरी स्थानिक उमेदवार असावा, अशी लोकांची आग्रही मागणी आहे. मी पक्षाचा आदेश मानून फॉर्म मागे घेण्यासाठी निघालो होतो, पण कार्यकर्ते आणि समर्थक मला जाऊच देत नाहीत. मी त्यांच्या भावनांचा सन्मान करतो.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0