Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे खून प्रकरण : एसआयटी/सीआयडी तपासासाठी परळीत ‘रास्ता रोको’, धक्कादायक आरोपांनी खळबळ!

•’कराड टोळी’मध्ये महिलांचा सहभाग, बाळा बांगर यांच्याकडून आणखी मोठे गौप्यस्फोट होणार?
बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी (विशेष तपास पथक) आणि सीआयडीमार्फत (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) करण्यात यावा, या मागणीसाठी आज परळी-अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले. महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा या हेतूने सुरू असलेल्या या आंदोलनात मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील सहभाग घेतला, ज्यामुळे या प्रकरणाला अधिक राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.
याच रास्ता रोको आंदोलनात संतोष देशमुख मृत्यू प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे जुने सहकारी बाळा बांगर हे धनंजय देशमुख यांच्यासोबत दाखल झाले. यावेळी बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडवर अनेक धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली.
बाळा बांगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “सदर प्रकरणात बोलू नको असे म्हणत माझ्यावर दबाव येत होता. मात्र त्यांना माहित नव्हतं की, मी या प्रकरणातील जबाब दिला आहे. मी घाबरणार नाही, माघारही घेणार नाही.” बांगर यांनी थेट आरोप केला की, “परळीला वाल्मिक कराडने कीड लावली आहे. मीच या प्रकरणात फरार होतो म्हणून मला बोलायला उशीर लागला. प्रशासनाने वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला अभय दिले.” बांगर यांनी असाही दावा केला की, “आता वाल्मिक कराड कधी बाहेर येणार नाही.”
काल व्हायरल झालेल्या एका रेकॉर्डिंगबद्दल बोलताना बांगर म्हणाले की, त्यांच्या पत्नीने ती रेकॉर्डिंग व्हायरल केली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या रेकॉर्डिंग प्रकरणाची सीडीआर काढण्यासाठी आपणही उपोषणाला बसणार असल्याचे बांगर यांनी घोषित केले. विशेष म्हणजे, त्यांनी “वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये काही महिलाही सक्रिय होत्या,” असा नवा गौप्यस्फोट केला. “माझ्याकडे वाल्मिक कराडचे सगळे पुरावे आहेत. पुढच्या महिन्यात मी पत्रकार परिषद घेणार आहे. मुंडे हत्या प्रकरणातील कराड टोळी जेरबंद झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
बाळा बांगर यांनी परळी पोलिसांवरील आपला विश्वास कमी झाल्याचे म्हटले. तसेच, वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्याविरोधात कट रचल्याचा अत्यंत गंभीर दावाही त्यांनी केला. “वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता. धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराड याला पोटनिवडणूक घ्यायची होती, ” असा धक्कादायक आरोप बांगर यांनी केला. एवढेच नव्हे तर, धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांना मारण्याचा कट देखील वाल्मिक कराडने रचला होता, असा दावा बांगर यांनी केला. माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनाही कराडने त्रास दिल्याचे त्यांनी सांगितले. ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे सरकायचे नाही, असा निर्धारही बांगर यांनी व्यक्त केला.



