मुंबई

Mahadev Munde Case : परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरणी एसआयटी स्थापन, मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा आदेश!

•हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश; ‘कुणीही असो, सोडणार नाही’ मुख्यमंत्र्यांचा शब्द

मुंबई :- परळी येथे दोन वर्षांपूर्वी, 21 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना दिला आहे.

आज महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गेल्या 21 महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षाची आणि पोलिसांच्या उदासीनतेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकल्यावर ते भावुक झाले. त्यांनी तात्काळ बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्याचे आदेश दिले.”

महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा तसेच ‘कराड गँग’चे इतर सदस्य सहभागी असल्याचा आरोप आहे, मात्र पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. “पोलीस प्रशासनाला परळीतील एका बंगल्यावरून फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला. तो फोन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने केला होता,” अशी धक्कादायक माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली. त्यांनी या फोन कॉलचा सीडीआर काढून त्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्याची विनंती केली. हत्येत सहभागी असलेल्या काही लोकांची नावेही आपण मुख्यमंत्र्यांना दिली असून, “कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, सगळ्यांना अटक करणार,” असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0