देश-विदेश
Trending

Leh Ladakh Violence News : लेह-लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती; आंदोलनाला हिंसक वळण, लेहमध्ये संचारबंदी तर कारगिलमध्ये कलम 144 लागू

Ladakh Violence News : सोनाम वांगचुक यांच्यावर ‘अरब स्प्रिंग’ शैलीच्या आंदोलनाचा कट रचल्याचा आरोप, 4 जणांचा मृत्यू

ANI :- पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लेह-लडाखमध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टानुसार राज्याचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या युवा पिढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने लेहमध्ये संचारबंदी (curfew) तर कारगिलमध्ये कलम 144 (पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी) लागू करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या संघर्षात चौघांचा मृत्यू झाला असून, 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

सरकारचा सोनाम वांगचुक यांच्यावर आरोप

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिक्षणतज्ञ सोनाम वांगचुक यांनी 10 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते. गृह मंत्रालयाच्या दाव्यानुसार, त्यांनी ‘अरब स्प्रिंग’ आणि नेपाळमधील ‘जेन झी’ आंदोलनांचा उल्लेख करत जनतेची दिशाभूल केली आणि आंदोलनाला हिंसक वळण दिले. सरकारकडून चर्चेसाठी उच्चाधिकार प्राप्त समिती (HPC) आणि उपसमितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत असतानाही त्यांनी उपोषण सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी थेट आपल्या गावाला रुग्णवाहिकेतून निघून गेल्याचेही म्हटले आहे.

सरकारकडून काय प्रयत्न सुरू आहेत?

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या परिशिष्टाचा विस्तार करण्याच्या मागणीवर सरकार लडाख ॲपेक्स बॉडी (लेह) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स सोबत चर्चा करत आहे. या चर्चेतून लडाखमधील अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण 45 टक्क्यांवरून वाढवून 84 टक्के करणे, परिषदांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देणे, भोटी-पुर्गीला अधिकृत भाषेचा दर्जा देणे यांसारख्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जात आहे. तसेच, विविध 1800 पदांवर भरती प्रक्रियाही सुरू झाली आहे.

उपराज्यपालांनी केला गंभीर आरोप

लेह लडाखमधील सध्याच्या परिस्थितीवर उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा हा प्रयत्न असून, त्याची तुलना बांगलादेश आणि नेपाळमधील दंगलींशी केली जात आहे. त्यांनी आंदोलनावर चर्चेने तोडगा काढण्याचे आवाहन केले असून, नाव न घेता काही व्यक्तींवर सतत तणाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0