मुंबई

Lalbaugcha Raja Update : ‘लालबागचा राजा’ मंडळ मानहानीचा दावा दाखल करणार; विसर्जनाच्या गोंधळावरून नवा वाद पेटला

•वडकर बंधूंवर खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा मंडळाचा आरोप

मुंबई :- मुंबईचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा मंडळाच्या विसर्जन सोहळ्यातील विलंबामुळे निर्माण झालेला वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी माध्यमांसमोर केलेल्या विधानांमुळे आपली बदनामी झाली असल्याचा दावा करत लालबागचा राजा मंडळाने त्यांच्यावर मानहानीचा (अब्रू नुकसानीचा) दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमका वाद काय?

यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे तब्बल 36 तास रखडले होते. या गोंधळानंतर हिरालाल वाडकर यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो आहोत. यंदा मंडळाने आम्हाला डावलून एका गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिले, त्यामुळे भरती-ओहोटीचा अंदाज चुकला आणि विसर्जनाला विलंब झाला.”

मंडळाने वाडकर यांचे दावे फेटाळले

मंडळाने वाडकर यांचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मंडळाच्या म्हणण्यानुसार, हिरालाल वाडकर यांचा लालबागचा राजा मंडळाशी कोणताही संबंध नाही आणि त्यांनी कधीही राजाचे विसर्जन केलेले नाही. मंडळाने म्हटले आहे की, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मंडळाची बदनामी करण्याच्या हेतूनेच त्यांनी सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये हा खोटा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या या विधानामुळे मंडळाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलीन झाली आहे.

या सर्व प्रकारानंतर, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाडकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या वादाला आता एक नवा आणि कायदेशीर आयाम मिळाला आहे.

vivek

Recent Posts