ठाण्यात ‘लेडी थीफ’चा पर्दाफाश: 10 घरफोड्या उघड, 10.99 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Thane Police Latest News : ठाणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, सराईत महिला आरोपी आणि तिच्या मुलाला अटक
ठाणे: ठाणे शहर पोलिसांनी घरफोडीच्या Thane Robbery Case गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करत, एका सराईत महिला चोर आणि तिच्या 20 वर्षीय मुलाला अटक केली आहे. या कारवाईमुळे एकूण 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 99 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. नौपाडा पोलिसांनी Nawpada Police Latest News अत्यंत शिताफीने आरोपींना जेरबंद करत, त्यांच्या आंतरराज्यीय पलायनाचा मनसुबाही उधळला आहे. Thane Police Latest News
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू होते. दिनांक 14 जुलै 2025 रोजी अतुल शरदचंद्र मराठे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांच्या घरातून 7 लाख 99 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. या तक्रारीनुसार, नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये भा. न्या. सं. कलम 305, 331 (3), 331 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्याकडे सोपवण्यात आला. पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय दवणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तपासी पथकाने तातडीने तपास सुरू केला.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक महिला दोन मुलांसह संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यापैकी एका लहान मुलीच्या पाठीवरील बॅगेतून घरफोडीचे साहित्य काढताना ती दिसली. पोलिसांनी त्यानंतर ठाणे शहरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये आरोपी महिला ही सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. ती ठाणे स्टेशन परिसर, तलावपाळी येथून फिरत फिरत घटनास्थळापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. पोलिसांना चकमा देण्यासाठी ही महिला प्रत्येक रस्त्यावर 300-400 मीटर पुढे जाऊन 15-20 मिनिटे थांबून पुन्हा रस्ता बदलत होती. मात्र, पोलिसांनी अथक प्रयत्नांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करत घटनेतील महिला आणि तिच्या साथीदारांचा चेहरा स्पष्ट केला.
आरोपींचे फोटो काढून ठाणे शहरातील सिध्देश्वर तलाव, खोपट, तलावपाळी, चंदनवाडी, ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, तसेच वागळे इस्टेट, वर्तकनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरफोडी करणारी महिला व तिचे साथीदार दिवा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे दिवा गाव, आदी ठिकाणी सलग दोन दिवस आणि दोन रात्री रेकी करण्यात आली. अखेर, दिवा गावातील डंपिंग ग्राऊंडजवळील दाट लोकवस्तीमध्ये आरोपी गणेश दिलीप गुप्ता उर्फ गणेश प्रकाश आव्हाड (वय 20, रा. डंपिंग ग्राऊंडच्या मागे, दिवा गाव, ठाणे) हा पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सपोनि भांगे आणि त्यांच्या तपास पथकाने पाठलाग करून त्याला घरफोडीच्या हत्यारासह डंपिंग ग्राऊंड येथून शिताफीने ताब्यात घेतले.

आई-मुलाची टोळी सक्रिय, 10 गुन्हे उघडकीस
दिनांक 17 जुलै 2025 रोजी रात्रीच्या अंधारात गणेश गुप्ता याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 25 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, त्याने त्याची आई पूजा दिलीप गुप्ता उर्फ पूजा प्रकाश आव्हाड (वय 45, रा. डंपिंग ग्राऊंडच्या मागे, दिवा गाव, ठाणे) हिच्यासोबत मिळून ठाणे शहर परिसरात अनेक घरफोड्या व चोऱ्या केल्याचे उघड झाले.
अटक आरोपीकडून 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2.5 किलो ग्रॅम चांदीची भांडी व दागिने, 40 हजार रोख रक्कम आणि घरफोडीची हत्यारे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उर्वरित दागिन्यांबाबत आरोपीकडे तपास सुरू आहे. गणेश गुप्ता हा घरफोडीतून मिळालेले सोने-चांदीचे दागिने व शिक्के मुंबई आणि ठाणे परिसरातील सराफांना विकून मिळालेले पैसे घेऊन परजिल्ह्यात पसार होण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने त्याचा हा मनसुबा फसला.



