ठाणेमुंबई
Trending

Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात ‘अटक वॉरंट’ जारी!

Manikrao Kokate Against Arrest Warrant : सदनिका घोटाळा प्रकरण: नाशिक न्यायालयाचा कडाडून प्रहार; मंत्रिपद धोक्यात, राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिक | राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गाजत असलेल्या ‘सदनिका घोटाळा’ प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कायद्यापुढे सर्व समान; न्यायालयाची चपराक

अटक वॉरंट जारी करताना न्यायालयाने अत्यंत कडक टिप्पणी केली. “कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो मंत्री असो वा सामान्य नागरिक,” अशा शब्दांत न्यायालयाने कोकाटे यांना फटकारले. याचिकाकर्त्या अंजली दिघोळे-राठोड यांनी कोकाटे यांच्या अटकेसाठी न्यायालयात अर्ज केला होता, ज्यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. कोकाटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे, असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिले आहेत.

न्यायालयात नाट्यमय युक्तिवाद
सुनावणी दरम्यान कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. “माणिकराव कोकाटे सध्या आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूतीने विचार व्हावा,” असा युक्तिवाद ॲड. मनोज पिंगळे यांनी केला. मात्र, उपचारांबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न केल्याने न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांचे वकील आशुतोष राठोड यांनी खळबळजनक दावा केला की, “कोकाटे आजारी नसून ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर आहेत.”

30 वर्षांपूर्वीचे प्रकरण भोवले

हे प्रकरण नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागातील ‘निर्माण व्ह्यू’ अपार्टमेंटमधील सदनिकांशी संबंधित आहे. 30 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या सदनिका कोकाटे यांनी स्वतःसह भाऊ आणि इतर साथीदारांच्या नावे मिळवल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी या घोटाळ्याची तक्रार केली होती.

अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. दोन वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब आणि आता अटक वॉरंट निघाल्याने, नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0