Kondhwa Gun Firing | कोंढव्यात वाळू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार : तिन्ही आरोपी ताब्यात !
- कोंढवा पोलिसांकडून संशयित आरोपींची धरपकड Kondhwa Gun Firing
- गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्टल जप्त!
पुणे, दि. १६ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Kondhwa Gun Firing
ऐन गणपती विसर्जन वेळी पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे उडवले जात आहेत. सलग गोळीबाराच्या घटनांनी शहरात दहशत पसरली आहे. आज कोंढवा येथे दुपारी एका वाळू व्यावसायिकावर बेछूट गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून व्यावसायिकावर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोंढवा गंगाधाम रोड येथील श्री दत्त वाळू सप्लायर्सचे दिलीप गायकवाड यांच्यावर दुपारी गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी कोणत्या कारणावरून गायकवाड यांच्यावर हल्ला केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. गोळीबाराची घटना होताच पुणे पोलीस, कोंढवा पोलीस दलातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी हल्ला करणारे तिघे कोंढवा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. तसेच गुन्ह्यातील पिस्टल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
यातील संशयित आरोपी बबलू सय्यद, जगताप, भुसारे यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हल्ला पूर्व नियोजित होता कि, अचानक घडला याबाबत पोलीस तपास करत आहेत. कोंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील सदर प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देऊन आहेत.