Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीला खिंडार? सत्तेसाठी शिंदे गट आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली; सतेज पाटलांच्या सूचक विधानाने खळबळ

Kolhapur Mahayuti News : भाजपला धक्का देत कोल्हापुरात नवे समीकरण? सत्तेच्या पडद्यामागील घडामोडींनी राज्याच्या राजकारणात खळबळ; बहुमतासाठी सुरू झाली जुळवाजुळव
कोल्हापूर l महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक ठिकाणी स्पष्ट बहुमताअभावी महापौरपदाचा पेच निर्माण झाला आहे. अशातच कोल्हापूर महानगरपालिकेतून एक धक्कादायक राजकीय वळण समोर येत असून, येथे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना (शिंदे गट) थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीमध्ये असलेल्या शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जाईल. या संभाव्य युतीबाबत काँग्रेसचे कणाधार आमदार सतेज पाटील यांनी “पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडी आताच जाहीर करू शकत नाही,” असे सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत 81 जागांपैकी बहुमतासाठी 41 आकड्यांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 37 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली, मात्र ते बहुमतापासून केवळ 4 पावले दूर राहिले. दुसरीकडे, भाजपने 27 जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. सुरुवातीला भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन महायुतीचा महापौर करतील, असा अंदाज होता. मात्र, शिंदे गटाच्या 15 नगरसेवकांनी काँग्रेसच्या 37 नगरसेवकांना पाठिंबा दिल्यास हा आकडा 52 वर पोहोचतो, जो बहुमतापेक्षा कितीतरी अधिक आहे.
जर कोल्हापुरात शिंदे गट आणि काँग्रेसची ही ‘विचित्र’ युती प्रत्यक्षात आली, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे मोठे पाऊल ठरेल. विशेष म्हणजे, राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत एकत्र असताना कोल्हापुरात मात्र वेगळी चूल मांडण्याच्या या हालचालींनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सतेज पाटील यांच्या सावध पण अर्थपूर्ण विधानामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून, कोल्हापूरचा ‘रणसंग्राम’ आता वैयक्तिक प्रतिष्ठेचा झाला आहे. आता कोल्हापूरच्या ऐतिहासिक महापालिकेत भगवा फडकणार की काँग्रेसचा हात उंचावणार, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल.



