ठाणे

दादर, कुर्ला, अंधेरीमध्ये गुडघाभर पाणी; पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Rain Latest Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; वसई-विरारमध्ये अनेक सोसायट्या पाण्याखाली

मुंबई :- शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले आहे. दादरसारख्या प्रमुख भागांसह अनेक उपनगरांत पाणी साचले असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवा विस्कळीत

सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. दादरमधील टी.टी. पूलजवळच्या पारसी कॉलनी, कुर्ला आणि वडाळा भागात गुडघाभर पाणी साचले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने चुनाभट्टी विभागातील अनेक परिसरातही पाणी साचले आहे. कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे रुळांवर पाणी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरू

मुंबई महानगरपालिकेतर्फे दादर स्टेशन परिसरात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर्सचा वापर केला जात आहे. तसेच मुंबई पोलिसही वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहेत. दुसरीकडे, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. विरार पश्चिम येथील युनिटेक सोसायटीतील 35 ते 40 सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गायमुख घाटातही जड वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

vivek

Recent Posts