मुंबई

Kishori Pednekar : ठाकरे गटात गटनेतेपदावरून ‘ठिणगी’! किशोरी पेडणेकरांच्या नियुक्तीने ज्येष्ठ नगरसेवक नाराज; ‘वरळी’च्या वर्चस्वावर शिवसैनिकांचा सवाल

Thackeray Members On Kishori Pednekar : माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्षांना डावलल्याची चर्चा; 65 नगरसेवक निवडून येऊनही अंतर्गत संघर्षाने मातोश्रीची डोकेदुखी वाढली

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे Mumbai BMC Election निकाल लागून अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. 65 जागा जिंकून महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या ठाकरे गटाने माजी महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांच्याकडे गटनेतेपदाची धुरा सोपवली आहे. मात्र, या निर्णयामुळे पक्षात आनंदाऐवजी नाराजीचेच सूर जास्त उमटत असून, अनुभवी नेत्यांना डावलून केवळ ‘वरळी’ लॉबीला महत्त्व दिले जात असल्याचा आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे.

ज्येष्ठांना डावलल्याने ‘मातोश्री’वर अस्वस्थता यंदाच्या निवडणुकीत मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आणि विठ्ठल लोकले यांसारखी महापालिकेचा दांडगा अनुभव असलेली मातब्बर मंडळी निवडून आली आहेत. यातील अनेक नेत्यांनी महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. अशा परिस्थितीत या सर्वांना बाजूला सारून पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांनाच झुकते माप दिल्याने पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः कोरोना काळातील आरोपांमुळे वादात सापडलेल्या व्यक्तीला गटनेतेपद दिल्याने आक्रमक आणि अनुभवी नगरसेवकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.

‘वरळी’ की संपूर्ण मुंबई?

शिवसैनिकांचा सवाल नाराज कार्यकर्त्यांचा सर्वात मोठा आक्षेप हा ‘वरळी’ विधानसभा मतदारसंघाच्या वाढत्या वर्चस्वावर आहे. वरळीत आधीच आदित्य ठाकरे यांच्यासह विधान परिषदेचे दोन आमदार, माजी महापौर आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठी फौज तैनात आहे. पक्षाची सर्व महत्त्वाची पदे आणि ताकद केवळ एकाच मतदारसंघाभोवती का फिरते आहे? असा बोचरा सवाल इतर विभागांतील शिवसैनिक विचारत आहेत. सर्व सत्ता एकाच ठिकाणी एकवटल्याने पक्षाच्या विस्तारावर परिणाम होत असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

पेचात अडकले नेतृत्व; फोडाफोडीचे सावट?

किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देतानाही पक्षात मोठी ओढाताण झाली होती, त्यांना एबी फॉर्मसाठी शेवटपर्यंत ताटकळावे लागले होते. आता थेट गटनेतेपद मिळाल्याने ही नाराजी उघड बंडाचे स्वरूप घेणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. फोडाफोडीच्या राजकारणात आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवणे हे उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान असताना, या अंतर्गत वादामुळे ‘मातोश्री’ची चिंता वाढली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts